साहेबांसाठी १० हजार आणि स्वतःसाठी ५ हजारांची केली होती मागणी; एसीबीची जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कारवाई
जळगाव (प्रतिनिधी):- सातबारा उताऱ्यावरील नोंद दुरुस्त करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भू-कर मापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. १ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील भूमी अभिलेख कार्यालयात करण्यात आली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, भू-कर मापक जितेंद्र प्रकाश पाटील (वय ४५, रा. भूषण कॉलनी, जळगाव) यांनी तक्रारदाराच्या सातबारा उताऱ्यावरील नोंद दुरुस्त करून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराच्या वडिलोपार्जित घराच्या कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याने त्यांच्या वडिलांचे नाव कमी करण्यात आले होते. याप्रकरणी भूमी अभिलेख विभागाकडे अपील करण्यात आले होते. अपील मंजूर होऊन वडिलांचे नाव पुन्हा सातबारा उताऱ्यावर लावण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आदेशानंतरही संबंधित नोंद अद्यावत करण्यात येत नव्हती.
तक्रारदाराने कामाबाबत विचारणा केली असता, जितेंद्र पाटील यांनी, “तुमचे काम मी साहेबांशी बोलून करून देतो, मात्र त्यासाठी साहेबांसाठी १० हजार रुपये आणि मला तुमच्या इच्छेनुसार काही रक्कम द्यावी लागेल,” अशी मागणी केल्याचा आरोप आहे.
यानंतर तक्रारदाराने दि. २५ जून रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणीत आरोपीने साहेबांसाठी १० हजार आणि स्वतःसाठी ५ हजार, अशी एकूण १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचून बुधवारी लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीने जितेंद्र पाटील यांना रंगेहाथ अटक केली.









