गुटखा, गावठी दारू, गावठी कट्टा जप्त; १२ फरार आरोपी जेरबंद, ७० संशयितांची चौकशी

या मोहिमेसाठी अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पाच दुय्यम अधिकारी, ४० पोलीस अंमलदार, उपविभागातील ३० कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे १० जवान आणि आरसीपीच्या तीन प्लाटूनचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सर्व पथकांना गुप्त सूचना देऊन शहरातील विविध भागांवर एकाचवेळी छापेमारी करण्यात आली.

कारवाईदरम्यान शहरातील अवैध गुटखा साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. सिंधी कॉलनीतील सुगनोमल किशनचंद बठेजा आणि फरशी पूल परिसरातील आकाश बाबूलाल सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ५२ हजार ५०० रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि गुटखा जप्त करण्यात आला.
दारूबंदी कायद्यांतर्गतही पोलिसांनी मोठी कारवाई करत करत्तारसिंग तरशेमसिंग शिख, निशीकांत प्रभाकर शिरसाठ, कैलास अमृत भिल, राजेंद्र कांतीलाल शिंदे, सुलोचना भाईदास भिल, रुपा विक्की बाटुंगे, योगेश हरी भोई आणि आनंद ईश्वर सोनवणे यांच्याविरुद्ध आठ स्वतंत्र गुन्हे दाखल केले. या धाडीत १२ हजार लिटर कच्चे-पक्के रसायन आणि २ हजार ९५० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण ८ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.
या मोहिमेतील महत्त्वाच्या कारवाईत अमळनेर आणि चोपडा शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने एका घातक गुन्ह्याचा पर्दाफाश केला. पोलिसांनी एक गावठी कट्टा, दोन मॅगझीन आणि दोन मोबाईल फोन जप्त करत तीन सराईत आरोपींना अटक केली. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी न्यायालयातून जारी करण्यात आलेल्या सात पकड वॉरंटची अंमलबजावणी करत विशाल दशरथ चौधरी, महेंद्र संतोष भोई, राजेश ऊर्फ सोनल घोडेवाला यांच्यासह सात आरोपींना अटक केली. तसेच अन्य नऊ जामीनपात्र वॉरंटचीही बजावणी करण्यात आली.
याशिवाय अमळनेर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील ११० संशयित व सराईत गुन्हेगारांची पडताळणी करण्यात आली. त्यापैकी ७० जणांची सखोल चौकशी करून त्यांचे ‘इंटरोगेशन फॉर्म’ भरून घेण्यात आले. तसेच विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या १२ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
या व्यापक आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे अमळनेर शहरातील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून पोलिसांच्या धडक मोहिमेचे कौतुक करण्यात येत आहे. पोलिसांनी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.









