भुसावळात डोळ्यात मिरचीची पूड फेकून पावणेचार लाखांची जबरी चोरी
टीव्ही टॉवर ग्राउंडसमोर काका-पुतण्याला रॉडने मारहाण; रोख रकमेसह मोबाईल लंपास


भुसावळ : शहरातील टीव्ही टॉवर ग्राउंडसमोरील सार्वजनिक रस्त्यावर काका-पुतण्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करत रोख रकमेसह मोबाईल असा ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने लुटल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तीन अज्ञात इसमांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरचीची पूड फेकून हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमान नगर परिसरातील रहिवासी मित आशिष कोटेचा (वय १९) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. १७ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास मित कोटेचा हे त्यांचे काका अजय कोटेचा यांच्यासोबत टीव्ही टॉवर ग्राउंडसमोरील रस्त्याने जात होते. यावेळी तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले.
आरोपींपैकी एकाने अचानक मित आणि त्यांच्या काकांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. डोळ्यांत तीव्र जळजळ होऊन दिसेनासे झाल्याचा फायदा घेत तिघांनी दोघांना लोखंडी रॉडने मारहाण केली.
बॅगेतील रोकड आणि मोबाईल हिसकावला
हल्ल्यानंतर आरोपींनी त्यांच्या बॅगेतील ३ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम आणि ५ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, त्यामध्ये जिओ कंपनीचे सिमकार्ड असा एकूण ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर तिघेही दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले.
पोलिसांकडून आरोपींचा शोध
या प्रकरणी १८ ऑगस्ट रोजी दुपारी १.२७ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल तायडे करीत असून, फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.








