जळगावात वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव
मलाबार गोल्ड अँड डायमंड्स आणि प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम; ज्येष्ठ छायाचित्रकारांचाही सन्मान


जळगाव, प्रतिनिधी : जागतिक छायाचित्रण दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. १८) मलाबार गोल्ड अँड डायमंड्स आणि प्रेस फोटोग्राफर फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ज्येष्ठ तसेच वृत्तपत्र आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील छायाचित्रकारांचा स्नेहपूर्ण वातावरणात भव्य सत्कार व सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि कॅमेरा पूजनाने करण्यात आली. यावेळी मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या नवीन डायमंड दागिन्यांचे लॉन्चिंगही करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जळगावच्या महापौर दीपमाला काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या स्टोअर मॅनेजर प्रियंका पाटील, सुजित नायर तसेच प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष संधीपाल वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘छायाचित्रकार हे समाजाचे डोळे’
महापौर दीपमाला काळे यांनी छायाचित्रकारांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “छायाचित्रकार हे समाजाचे डोळे आहेत. समाजात घडणारे सत्य आणि वास्तव आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचे अत्यंत जबाबदारीचे आणि महत्त्वपूर्ण कार्य तुम्ही करत आहात.”
फोटोग्राफीमध्ये ‘एथिक्स’ महत्त्वाचे
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आपल्या मनोगतात फोटोग्राफीच्या आवडीविषयी तसेच या क्षेत्रातील अनुभवांविषयी सांगितले. पत्रकारिता आणि छायाचित्रण क्षेत्रात काम करताना नैतिक मूल्ये जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
“फोटोग्राफी करताना पत्रकारितेची आणि छायाचित्रणाची नैतिक मूल्ये (एथिक्स) जपणे अत्यंत आवश्यक आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
आजी-माजी छायाचित्रकारांची उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमित देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत पाटील, अभिजीत पाटील, प्रकाश लिंगायत, अरुण इंगळे, जुगल पाटील, पांडुरंग महाले आणि सचिन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
या स्नेहसोहळ्यास जळगाव शहरातील आजी-माजी वृत्तपत्र छायाचित्रकार तसेच डिजिटल मीडिया क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









