विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे अंतरंग उलगडले; प्रकट वाचनातून वाचनसंस्कृतीचा जागर
शिरसोली, ( प्रतिनिधी ) – शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, पुस्तकांशी मैत्री वाढावी आणि वाचनसंस्कृती रुजावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षण विद्या मंडळाचे अध्यक्ष ॲड. निलेशभाऊ खलसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती के. आर. धांडे व सौ. आर. जी. बारी यांनी केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे अंतरंग उलगडून सांगितले, तर काही विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे प्रकट वाचन केले. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्त्व समजून घेण्याची तसेच वाचनातून ज्ञान आणि विचारांची समृद्धी साधण्याची संधी मिळाली. सौ. एन. ए. अकोले यांनी ‘प्रयत्ने वाळूचे…’ या पुस्तकाचे अंतरंग उपस्थितांसमोर मांडले.
अध्यक्षीय भाषणात ॲड. निलेशभाऊ खलसे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते आणि व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते, याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एन. ए. अकोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. एन. सी. वाणी यांनी केले.
यावेळी शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक श्री. एस. ए. भदाणे, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस. पी. दुबे, श्री. आर. एस. अस्वार, श्रीमती दीपाली पाटील, प्रयोगशाळा सहाय्यक श्री. जी. व्ही. बारी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पुस्तकांविषयीची अभिरुची यामुळे विद्यालयातील वाचन प्रेरणा दिवसाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.









