महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने कार्यवाही पूर्ण



जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव येथील प्रसिद्ध वल्लभदास वालजी (व. वा.) जिल्हा वाचनालयाच्या १५० व्या वर्धापन दिनाचे (दीडशे वर्षे) औचित्य साधून वाचनालय असलेल्या रस्त्याचे ‘व. वा. जिल्हा वाचनालय मार्ग’ असे नामकरण करण्यात आले आहे. या मार्गाचे उद्घाटन खासदार स्मिताताई वाघ, जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.
महात्मा गांधी रोडवरील अमर रगडा येथून वाचनालयाकडे वळणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक नामफलक लावून परिसराचे सौंदर्य वाढवण्यासोबतच वाचन संस्कृती जपण्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला आहे. वाचनालयाला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, वाचनालयाकडून महापौर दीपमाला काळे यांच्याकडे या रस्त्याला ‘व. वा. जिल्हा वाचनालय मार्ग’ नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने प्रस्तावही मागविण्यात आले होते.
महापौरांनी खा. स्मिताताई वाघ, आ. राजूमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा महासभेत प्रस्ताव मांडला होता. मनपा महासभा ठराव क्रमांक ६५ नुसार या प्रस्तावाला मंजुरी देऊन नामकरण करण्यात आले. नामकरणाचा हा निर्णय अस्तित्वात आल्याबद्दल वाचनालय प्रशासनाने महापौर दीपमाला काळे यांचे विशेष आभार मानले आहेत.
या नामकरण आणि उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मनपा आयुक्त आदित्य जीवने, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन तसेच व. वा. वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, उपाध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, कार्याध्यक्ष सीए अनिलकुमार शाह आणि चिटणीस प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष उपक्रम
१५ ऑक्टोबर रोजी असणाऱ्या ‘वाचन प्रेरणा दिना’चे औचित्य साधून या नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर वाचनालयात विशेष वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांनी वाचनालयात येऊन किमान १० मिनिटे पुस्तकांचे वाचन करावे, असे आवाहन करण्यात आले होते.याची नोंद विविध रेकॉर्ड बुकमध्ये घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.









