मुंबई ( प्रतिनिधी) – नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उल्लेखनीय विजय मिळवणारे गोकुळ गीते यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भविष्यात शिवसेनेचे “सहयोगी सदस्य” म्हणून कार्य करण्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका जाहीर केली.

यावेळी गोकुळ गीते यांनी राज्यात विकासाभिमुख राजकारणाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त केला. राज्यात सुरू असलेली विकासकामे, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी घेतलेले निर्णय तसेच पायाभूत सुविधांमध्ये होत असलेली गुंतवणूक यामुळे शिवसेनेकडे अनेक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते आकर्षित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यापुढे शिवसेनेच्या विचारधारेसोबत राहून संघटना बळकट करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याचा निर्धारही गोकुळ गीते यांनी व्यक्त केला.
यावेळी मंत्री उदय सामंत, आमदार किशोर पाटील, शिवसेना उपनेते चंद्रकांत रघुवंशी, माजी खासदार राहुल शेवाळे, राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, माजी खासदार उन्मेष पाटील तसेच स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.









