
घरातील कपाटावर ठेवलेला दूरदर्शन संच ठरला जीवघेणा; परिसरात हळहळ
यावल, ( प्रतिनिधी ) :- यावल तालुक्यातील आमोदा येथे रविवारी पहाटे घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. घरातील कपाटावर ठेवलेला दूरदर्शन संच (टीव्ही) अचानक डोक्यावर कोसळल्याने गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून पिंजारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नाजमीन मोहम्मद इसहाक पिंजारी (वय १३, रा. मस्जिदजवळ, आमोदा, ता. यावल) ही मुलगी रविवारी पहाटे सुमारे पाच वाजेच्या सुमारास आपल्या घरात होती. यावेळी घरातील रिकाम्या कपाटावर ठेवलेला टीव्ही अचानक तोल जाऊन तिच्या डोक्यावर पडला. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी नाजमीनला तातडीने उपचारासाठी भुसावळ येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. अल्पवयीन मुलीच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.
याप्रकरणी मुलीचे वडील मोहम्मद इसहाक इस्माईल पिंजारी (वय ३८) यांनी यावल पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यांच्या माहितीवरून भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून प्रथम खबरी अहवाल तालुका दंडाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैयद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मोती पवार पुढील तपास करीत आहेत.









