अमळनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील चाकवे शिवार परिसरातून अज्ञात चोरट्यांनी शेतातील सहा जनावरे चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रताप श्रीकृष्ण पाटील (वय ५१, व्यवसाय शेती, रा. सडावण, ता. अमळनेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ५ मे रोजी रात्री ११ ते ६ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान चाकवे शिवारातील शेत गट क्रमांक १६९ मधील शेड तसेच संदीप पाटील यांच्या शेत गट क्रमांक ६८/२ मधील खुल्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी जनावरे चोरी करून नेली.
चोरीस गेलेल्या जनावरांमध्ये विविध रंगांच्या गायी व बैलांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे ४० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.











