मुक्ताईनगर, यावल आणि बोदवडच्या जागांवर एकमत नाही; आज अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी आणखी ८ ते १० जागा बिनविरोध होण्याची शक्यता
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, २१ जागांसाठी तब्बल ४०० हून अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी आतापर्यंत चार जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १७ जागांसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. विशेषतः मुक्ताईनगर, यावल आणि बोदवड येथील जागांवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, आज मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस असल्याने आणखी ८ ते १० जागा बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेची समीकरणे नेमकी कशी जुळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यापूर्वी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांच्या आई नलिनी पाटील आणि पत्नी मृणाल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याचप्रमाणे भाजपचे मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचीही भुसावळ मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली आहे. त्यानंतर आता आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यादेखील बिनविरोध झाल्याने एकूण चार जागांवरील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, उर्वरित जागांवरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीकडून सर्वाधिक जागा बिनविरोध करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर जळगाव येथील शासकीय अजिंठा विश्रामगृहात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या. या बैठकीत मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार अनिल पाटील यांच्यात जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली. तब्बल पाच तास चाललेल्या या बैठकीत बहुतांश जागांबाबत सहमती झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी मुक्ताईनगर, यावल आणि बोदवड येथील जागांचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. याशिवाय महाविकास आघाडीला देण्यात येणाऱ्या एका जागेबाबतही अंतिम निर्णय झालेला नसल्याने जागावाटपाचा तिढा कायम आहे.
दरम्यान, पाचोरा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांच्या उमेदवारी अर्जाबाबत महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. यापूर्वी त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला होता. मात्र, या निर्णयाविरोधात त्यांनी नाशिक येथील सहाय्यक आयुक्तांकडे दाद मागितली होती. त्यानंतर त्यांच्या अर्जाला वैधता मिळाल्याने निवडणूक लढविण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे, जामनेर मतदारसंघातून रघुनाथ पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जात आहे.
महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न सोडविण्यासाठी आतापर्यंत जवळपास चार बैठका पार पडल्या आहेत. मात्र, प्रदीर्घ चर्चा होऊनही काही महत्त्वाच्या जागांबाबत अंतिम तोडगा निघालेला नाही. विशेष म्हणजे, महायुतीकडून महाविकास आघाडीला २१ पैकी एक जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ही जागा महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला द्यायची, याचा निर्णय संबंधित आघाडीच्या नेत्यांनी घ्यावा, अशी भूमिका महायुतीकडून मांडण्यात आली आहे. त्यामुळे या प्रस्तावावर महाविकास आघाडी काय निर्णय घेते, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आज १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस असल्याने राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे. मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आणखी ८ ते १० जागा बिनविरोध होऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची मनधरणी, राजकीय तडजोडी आणि जागावाटपाबाबत चर्चा सुरू राहण्याची शक्यता आहे. अर्ज माघारीनंतर नेमक्या किती जागा बिनविरोध होतात, कोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहतात आणि महायुतीसह महाविकास आघाडीची अंतिम रणनीती काय असते, हे स्पष्ट होणार आहे. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे महायुतीचे प्रयत्न कितपत यशस्वी ठरतात, याकडे आता संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








