पोक्सो कायद्यांतर्गत अमळनेर न्यायालयाचा निर्णय
चोपडा (प्रतिनिधी) :- येथील शहर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अपहरण करून पळवून नेत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोकसो कायद्या अंतर्गत अमळनेर न्यायालयाने पंधरा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
अविनाश सुरेश धनगर (वय २२, रा. भावेर ता. शिरपुर) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने सदर तरुणीची अपहरण करून तिला रोहीणी भोईटी, मानपुर, (म.प्र.) सुन्द्रेल, ओकांरेश्वर अशा विविध ठिकाणी घेवुन गेला व पिडीता ही अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखील तिचेसोबत लैंगिक अत्याचार केला. त्याबाबत पिडीत मुलीच्या पालकांनी चोपड़ा शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन दि. १६ डिसेंबर २०२१ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये तांत्रिक बाबींचे विश्लेषण करुन गुन्हयातील पिडीत मुलगी व आरोपी यांना ओंकारेश्वर, मध्यप्रदेश येथुन ताब्यात घेण्यात आले होते. नमुद आरोपीतास गुन्हयाकामी अटक केलेनंतर गुन्हयाचे तपासी अधिकारी सहा. पोलीस निरिक्षक अजित सावळे यांनी गुन्हयामध्ये परिस्थितीजन्य पुरावे व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचेकडे कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपीताचे विरुध्द अतिरिक्त सत्र न्यायालय, अमळनेर येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सदर गुन्हयाची सुनावणी पी. आर चौधरी, जिल्हा न्यायाधिश, अतिरिक्त सत्र न्यायालय, अमळनेर यांचे न्यायालयात करण्यात आली. सदर गुन्हयाची सुनावणी पुर्ण होवुन दि. ६ नोव्हेंबर रोजी सदर खटल्यात आरोपी अविनाश सुरेश धनगर याचे विरुध्द भादंवि कलम ३६३ कलमान्वये ५ वर्ष तसेच बालकांचे लैगींक अपराधापासुन संरक्षण कायदानुसार मध्ये १० वर्ष अशी एकुण १५ वर्ष सश्रम कारावास शिक्षा ठोठावण्यात आली.
सदर गुन्हयाचा प्राथमिक तपास पोहेकॉ. प्रदीप राजपुत यांनी केला असुन पुढील तपास सपोनि. अजित सावळे यांनी केला. तसेच सदर खटल्याचे कामकाज सरकारतर्फे सरकारी वकील राजेद्र बी. चौधरी यांनी पाहीले. पैरवी अधिकारी म्हणुन पोकाँ. नितिन कापडणे यांनी कामकाज केले आहे.