जळगाव (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करून त्याच पदावर समायोजन करावे, या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील आरोग्य विभागतील आयुष डॉक्टर्स (आयुर्वेदिक, होमिओपॅथीक, युनानी, योगा तज्ञ), कर्मचारी सर्वांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हा परिषदसमोर वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यात आज पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामध्ये (एन.एच. एम.) सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत, शासनाने वारंवार या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना मानधन वाढ तसेच कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासन दिले, मात्र शासनाने कधी पाळले नाही परिणामी २५ ऑक्टोबर पासून राज्यभर कामबंद आंदोलन सुरू आहे. कोरोना काळातही जिवाची पर्वा न करता या सर्व डॉक्टर्सनी आपली सेवा देत राहिले, तरी सुद्धा शासनाने आमचीची दखल घेत नाही आहे, परिणामी आजपासून जिल्हाभर काम बंद संपामधे सामील होत आहोत, अशी प्रतिक्रिया ह्या वेळेस व्यक्त करण्यात आली.
आज मा.जिल्हाधिकारी, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात जळगाव,मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा, पारोळा, चोपडा, अमळनेर येथील सर्व आयुष वै.अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्था पूर्णपणे कोळमली आहे व याचा मोठा ताण आला आहे.