रेल्वे स्टेशन परिसरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्टेशनसमोर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ धक्का लागल्याच्या कारणावरून एकाला अनोळखी तरूणाने चाकूने छातीवर वार करून दुखापत केल्याची घटना रविवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉरेन्स अमीथाराज (वय-४५) रा. बँगलोर, कर्नाटक हा तरूण कामाच्या निमित्ताने भुसावळ रेल्वे स्टेशनवर उतरले होते. रविवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून पायी जात असतांना एका अनोळखी तरूणाला त्याचा धक्का लागला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर अनोळखी तरूणाने लॉरेन्स यांच्या छातीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यांना भुसावळ शहरातील ट्रामा केअर सेंटर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर रात्री १० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीसात अनोळखी तरूणाच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे.