नांदगाव येथे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांचा डल्ला; राजेंद्र निकम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : बोदवड तालुक्यातील नांदगाव येथे घरफोडी करून ४० हजार रुपयांची रोकड आणि इंडियन गॅस एजन्सीची दोन गॅस पासबुक चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनमध्ये संशयित आरोपी राजेंद्र बाबुराव निकम (रा. नांदगाव, ता. बोदवड, जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव येथील फिर्यादी महिला कुसुमबाई पवन सूर्यवंशी (वय ५६) यांच्या घरी ही चोरी झाली. दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ ते २ वाजेच्या दरम्यान घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने घरात प्रवेश केला.
यावेळी घरातील ४० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच इंडियन गॅस एजन्सीची दोन गॅस पासबुक असा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. या घटनेप्रकरणी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता बोदवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ व ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बोदवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम जाधव करीत आहेत.









