कळमडूतील कुंभार रोडवर डंपर पकडला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव, ( प्रतिनिधी ) : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करत मेहुणबारे पोलिसांनी १४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २९ ऑक्टोबर रोजी कळमडू गावातील कुंभार रोडलगत करण्यात आली. याप्रकरणी महेश दिनकर सूर्यवंशी याच्याविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला वेग येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष पथके तयार करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सहयाद्री बिलें यांनी पथकाला अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाईच्या सूचना दिल्या.
२९ ऑक्टोबर रोजी गोपनीय बातमीदारामार्फत कळमडू गावातील कुंभार रोडलगत महेश दिनकर सूर्यवंशी हा अवैधरीत्या वाळूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता, वैध पास किंवा परवाना नसताना डंपरमधून शासकीय गौण खनिज वाळूची वाहतूक होत असल्याचे आढळले. पोलिसांनी डंपरसह वाळू जप्त केली.
या कारवाईत १४ लाख रुपये किमतीचा टाटा सिग्मा डंपर (क्रमांक एमएच ०४ झेडई ९२३२) आणि सहा हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू, असा एकूण १४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८ मधील पोटकलम ७ व ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सहयाद्री बिलें यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस नाईक योगेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार आणि विक्रम पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.









