सराफ नगरातील घराला चोरट्यांचे लक्ष्य; दरवाजाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरले, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील फैजपूर शहरातील सराफ नगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूर येथील सराफ नगर परिसरात फिर्यादी यांच्या बहिणीचे घर आहे. दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजेपासून ते ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान हे घर बंद असल्याची संधी अज्ञात चोरट्यांनी साधली.
चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याच्या विविध अंगठ्या, टापसे, पोत मणी-मंगळसूत्र तसेच सोन्याच्या गोफाचा समावेश असून, एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख ९० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेप्रकरणी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) व ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद वसंत गामणे करीत आहेत.









