पारोळ्यात AI चा वापर करून ब्लॅकमेलिंग अन् महिलेवर अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल


बनावट फोटो, अॅसिड हल्ला अन् जीवे मारण्याची धमकी
पारोळा प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातीलएका गावातील एका कुटुंबाला ब्लॅकमेल करून अश्लील फोटो-व्हिडिओच्या आधारे आर्थिक पिळवणूक करणे आणि घरातील महिलांवर अत्याचार करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून मुलीचे अश्लील फोटो तयार करणे, अॅसिड फेकण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देऊन जबरी अत्याचार करणाऱ्या ३ आरोपींविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी निखिल अरुण चौधरी, पवन युवराज भोई आणि विजय सुभाष वाणी (सर्व रा. ता. पारोळा) यांनी तक्रारदार महिलेच्या पतीला जाळ्यात ओढून जळगाव येथील एका महिलेशी ओळख करून दिली होती. त्यानंतर संबंधित महिलेसोबतचे फोटो व व्हिडिओ मोबाईलमध्ये काढून गेल्या तीन महिन्यांपासून तक्रारदाराच्या पतीला ब्लॅकमेल केले जात होते.
त्या आधारे आरोपींनी १५ मे २०२६ रोजी ५० हजार रुपये आणि १९ जुलै २०२६ रोजी १ लाख रुपये अशी १ लाख ५० हजारांची रक्कम उकळली. तरीही आरोपींनी आणखी २ लाख रुपयांची मागणी लावून धरली.
AI च्या माध्यमातून मुलीचे तयार केले अश्लील फोटो
पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी तक्रारदाराच्या मुलीचा पाठलाग करणे सुरू केले. संशयित आरोपी निखिल चौधरी याने AI (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर करून तक्रारदाराच्या मुलीच्या चेहऱ्याशी जुळणारे अत्यंत अश्लील फोटो तयार केले आणि ते सोशल मीडियावर (Snapchat व WhatsApp) व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच, ‘तू शारीरिक संबंध ठेवले नाहीस, तर तुझ्या तोंडावर अॅसिड फेकून तुझे आयुष्य उद्ध्वस्त करू’, अशी धमकीही देण्यात आली.
घरात घुसून महिलेवर अत्याचार व विनयभंग
दिनांक २९ जुलै २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता तिघे आरोपी तक्रारदाराच्या घरात जबरदस्तीने घुसले. त्यांनी तक्रारदार महिलेला तिचे आणि तिच्या मुलीचे अश्लील फोटो दाखवून ‘शारीरिक सुखाची’ मागणी केली. महिलेने प्रतिकार केला असता, आरोपींनी तिच्यासोबत अत्यंत लज्जास्पद वर्तन करून तिच्यावर अत्याचार केला. त्याचवेळी महिलेचा पती घरी आल्यावर आरोपींनी त्याला “जास्त शहाणपणा केला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देऊन पळ काढला.
पोलिसांत गुन्हा दाखलसततचा मानसिक, शारीरिक त्रास आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर ३९ वर्षीय गृहिणीने पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
त्यावरून पारोळा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act – 2000) मधील कलम ६४, ७४, ७५, ७८, ३०८(२), ३५६, ३३३, ३५१(२), ३५२, ३(५) सह आयटी अॅक्ट कलम ६६(C), ६६(E), ६७ आणि ६७(A) अन्वये गुन्हा नोंदवला आहे (गु.र.नं. ३०७/२०२६).
पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









