जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल; फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू
विशेष प्रतिनिधी


जळगाव : जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील आंबेडकरनगर येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास रस्त्यावर एक मृत पुरुष जातीचे अर्भक आढळून आल्याने तीव्र खळबळ उडाली आहे. रक्ताने माखलेल्या अवस्थेत हे अर्भक आढळल्याने स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेडकरनगर या दाट लोकवस्तीच्या भागातील एका गल्लीत मंगळवारी पहाटेच्या सुमारास नागरिकांना रस्त्यावर रक्ताने माखलेले मृत अर्भक दिसून आले. हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी तातडीने शनीपेठ पोलिसांना माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून शनीपेठ पोलीस ठाण्याचे पथक आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा केले असून रीतसर पंचनामा करण्यात आला आहे.
अंधाराचा फायदा घेऊन कृत्य
पहाटेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने हे अर्भक टाकून पलायन केले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अर्भकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याचा जन्म कुठे झाला आणि त्याला तेथे कोणी आणून टाकले, या मुख्य प्रश्नांचा शोध पोलीस घेत आहेत.
परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, पहाटेच्या सुमारास झालेल्या संशयास्पद हालचालींचा माग काढला जात आहे. फॉरेन्सिक अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल, अशी माहिती शनीपेठ पोलिसांनी दिली आहे.








