आरोग्य यंत्रणा प्रकृतीवर लक्ष ठेवून
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पाचोरा तालुक्यातील एका २४ वर्षीय महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सदर महिलेवर सध्या जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


एका खासगी प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचणीत या महिलेचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या वृत्ताला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांनी ‘केसरीराज’शी बोलताना अधिकृत दुजोरा दिला आहे.
येत्या दोन दिवसांत सदर महिलेचे नमुने पुन्हा एकदा सरकारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार असून, त्यानंतर पुढील वैद्यकीय पावले उचलली जातील. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणेला पूर्णपणे सतर्क आणि दक्ष राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.









