चाळीसगावात घरफोडी; घरातून ८० हजारांची रोकड लंपास
चार जणांविरुद्ध संशय व्यक्त; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


चाळीसगाव | प्रतिनिधी
चाळीसगाव शहरातील नागद रोड परिसरात भरदिवसा घरफोडी करून घरातील ८० हजार रुपयांची रोकड चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नसीम बी. अशरफ अली (वय ५५, व्यवसाय- किराणा दुकानदार, रा. नागद रोड, झोपडपट्टी परिसर, चाळीसगाव) यांनी तक्रार दिली आहे.
फिर्यादीनुसार, ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान अज्ञातांनी त्यांच्या घराच्या मागील बाजूने प्रवेश करून घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेली ८० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. चोरीस गेलेल्या रकमेत ५०० रुपयांच्या ८० नोटा, २०० रुपयांच्या १०० नोटा आणि १०० रुपयांच्या २०० नोटांचा समावेश आहे.
या प्रकरणात फिर्यादी यांनी नदीम शहा लियाकत शहा व त्याच्या अन्य तीन साथीदारांवर संशय व्यक्त केला आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305 व 331(3) अन्वये चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे .









