गोयलनगरातील घर चोरट्यांनी फोडले; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल चोरीला
अमळनेर ( प्रतिनिधी ) – शहरातील गोयलनगर परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ५१ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगलाबाई गोपाळ पाटील (वय ६६, रा. गोयलनगर, अमळनेर) या घरकामाचा व्यवसाय करतात. त्यांचे घर बंद असताना १८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजेपासून १९ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या कडी-कोंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्याने घरातील कपाटातून सोन्याच्या दोन माळा, कानातील टॉप्स तसेच चांदीचे ब्रेसलेट, मूर्ती, लक्ष्मीचे शिक्के व हत्तीच्या प्रतिकृतीचे दागिने असा एकूण ५१ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळाबाई पाटील यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे गोयलनगर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. १९९८ मिलिंद सोनार करीत आहेत.









