अमळनेरमध्ये घरफोडी; बंद घर फोडून सुमारे ३ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
कुलूप तोडून चोरट्यांचा धाडसी डाव; पोलिसांकडून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल


अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर शहरातील महस्कर प्लॉट परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ९९ हजार ४५० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश अर्जुनदास जीवनानी (वय ५२, व्यवसाय – कापड व्यावसायिक, रा. महस्कर प्लॉट, स्वामी नारायण मंदिरासमोर, अमळनेर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, १ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० ते २ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० या कालावधीत ते आपल्या मोठ्या भावाच्या घरी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या ऐवजात २८ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, १० ग्रॅमचा नेकलेस व कानातील टॉप्स, १० ग्रॅमची सोन्याची चेन व लॉकेट तसेच ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण २ लाख ९९ हजार ४५० रुपयांचा ऐवज असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 331(3), 331(4) आणि 305(A) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकडे करीत आहेत.









