अमळनेर पोलिसांचा दणका; गांधीपुऱ्यात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या !

अमळनेर: गांधीपुरा परिसरात वारंवार दहशत निर्माण करणाऱ्या व नागरिकांना धमकावणाऱ्या राजेश एकनाथ निकुंभ उर्फ दादू धोबी या सराईत गुन्हेगारावर अमळनेर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी धडक कारवाई केली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत थेट गांधीपुरा पोलीस चौकीपर्यंत पायी चालवत आणले. पोलिसांच्या या रोखठोक आणि आक्रमक कारवाईमुळे परिसरातील गुंड आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमधून पोलिसांच्या या भूमिकेचे जोरदार स्वागत केले जात आहे.
या कारवाईबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, संशयित आरोपी राजेश निकुंभ याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न करण्यासह इतर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. तो सध्या जामिनावर बाहेर आला होता. मात्र, जामिनावर सुटल्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताही सुधार झाला नव्हता. तो गांधीपुरा परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना चाकूचा धाक दाखवणे, दमदाटी करणे, मारहाण करून लूटमार करणे अशा बेकायदेशीर घटना घडवत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याच्या वाढत्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक कमालीच्या भीतीखाली वावरत होते.
या सर्व गंभीर तक्रारींची तातडीने दखल घेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पोलीस ताफ्यासह त्याच्या घरावर छापा टाकला. त्याला तातडीने ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची परिसरातून पायी मिरवणूक काढत त्याला गांधीपुरा पोलीस चौकीत आणले. तेथे त्याची आणि त्याच्या साहित्याची कसून झाडाझडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान त्याच्याकडे कोणतेही घातक शस्त्र आढळून आले नाही.
त्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा अशा प्रकारची बेकायदेशीर कृती केल्यास अत्यंत कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देत कडक शब्दांत समज दिली. अमळनेर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन कोणतीही गय करणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईच्या माध्यमातून देण्यात आला आहे.









