भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव शहरातील पोलीस लाईन परिसरातून सुमारे २० लाख रुपये किमतीचा डंपर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहिती नुसार, चोरीस गेलेला डंपर टाटा सिग्मा कंपनीचा असून त्याची किंमत अंदाजे २० लाख रुपये आहे. डंपरला नवीन पासिंग असल्याने त्यावर कायमस्वरूपी नंबर प्लेट नव्हती. मात्र, वाहनावर यूपी ३२ एटीसी ७०६ असा क्रमांक नमूद असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.
नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून गुन्हा
या प्रकरणी प्रसुधीर किटकुल सोनवणे (वय ५१, व्यवसाय नोकरी), नायब तहसीलदार, रा. साईनगर, भडगाव यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चोरीच्या घटनेचा तपास भडगाव पोलीस करीत असून अद्याप आरोपीची ओळख पटलेली नाही. शहरातील पोलीस लाईन परिसरातूनच लाखो रुपये किमतीचे वाहन चोरीला गेल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.








