१७ वर्षीय तरुणीची प्रसूती, पतीविरुद्ध गुन्हा दाखल!; बालविवाहातून लैंगिक शोषण झाल्याची तक्रार
भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या विवाहानंतर तिचे लैंगिक शोषण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अवघ्या १७ वर्षे ४ महिन्यांच्या विवाहितेने एका बालिकेला जन्म दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली असून, याप्रकरणी पतीविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहिती नुसार, पीडितेचा विवाह अल्पवयीन असताना झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. विवाहानंतर पतीकडून वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. या संबंधातून ती गर्भवती राहिली होती.
दरम्यान, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिने एका बालिकेला जन्म दिला. या घटनेनंतर संबंधित प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
पीडितेच्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.








