स्वातंत्र्य चौकातील अस्ताव्यस्त वाढलेली झाडे ठरताहेत अपघाताचा सापळा

मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात
जळगाव: जळगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्वातंत्र्य चौक परिसरातील रस्ता दुभाजकांवर लावण्यात आलेली शोभेची झाडे सध्या वाहनधारकांसाठी मोठी डोकेदुखी ठरू लागली आहेत. या झाडांची गेल्या अनेक दिवसांपासून नियमित छाटणी न झाल्यामुळे ती प्रमाणाबाहेर आणि अस्ताव्यस्त वाढली आहेत. परिणामी, नवीन बस स्थानक आणि आकाशवाणी चौकाकडून येणारी वाहने वळणावर स्पष्ट दिसत नसल्याने या परिसरात दररोज गंभीर अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
स्वातंत्र्य चौक हा शहरातील प्रमुख वाहतूक मार्गांपैकी एक मानला जातो. दररोज या चौकातून हजारो दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. चौकाच्या आसपास दुभाजकांवर शहराच्या सुशोभीकरणासाठी लावलेली ही झाडे आता देखभालीअभावी सुरक्षिततेलाच धोका निर्माण करत आहेत. विशेषतः वळणावर दुभाजकाच्या पलीकडून येणारे वाहन या वाढलेल्या झाडांच्या झाडीमुळे चालकांना दिसत नाही. त्यामुळे अचानक समोर येणाऱ्या वाहनांमुळे चालकांना अचानक ब्रेक दाबावा लागत असून, अनेकदा दुचाकी घसरण्याचे आणि किरकोळ धडक बसण्याचे प्रकार येथे घडत आहेत.
दिवसासोबतच रात्रीच्या वेळी या समस्येत अधिकच भर पडत असून अपघाताचा धोका दुप्पट झाला आहे. दुभाजकांवरील झाडांच्या पसरलेल्या फांद्यांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांच्या हेडलाईटचा योग्य अंदाज येत नाही. याशिवाय अनेक ठिकाणी रस्त्यावरील दिव्यांचा प्रकाश या झाडांच्या दाट पानांमुळे झाकला जात असल्याने महामार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरते. त्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.
एवढा गंभीर विषय असूनही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर आणि कोणाचा तरी बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या अपघाती स्थितीची गांभीर्याने दखल घेऊन महापालिकेच्या उद्यान विभागाने तातडीने या अस्ताव्यस्त फांद्यांची छाटणी करावी, अशी जोरदार मागणी डॉ. अभय भावे यांनी केली आहे.









