पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश, नियुक्ती आदेश व गटई स्टॉलचे वाटप
जळगाव (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागातर्फे शुक्रवारी सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना धनादेश, नियुक्ती आदेश तसेच साहित्याचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रास्ताविकातून समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्यानही आयोजित करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात अॅट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत विश्वास अर्जुन घोडे (रा. श्रीराम नगर, धुळे) आणि रवि अशोक दांडगे (रा. डोंगरगाव, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले.
तसेच दिवंगत ऊसतोड कामगार धुडकू कथा अहिरे यांच्या वारस कथा अर्जुन अहिरे यांना शासनाच्या योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांच्या आर्थिक सहाय्याचा धनादेश देण्यात आला.
स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी १० लाभार्थ्यांना गटई स्टॉलचे वाटप करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करत शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार अंतर्गत पाच विद्यार्थ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे यांनी केले.









