अमळनेर(प्रतिनिधी):- शहराबाहेरील धार-मारवड रस्त्यावरील चिन्मय हॉटेलच्या मागील शेतात अचानक भीषण आग लागल्याची घटना १५ मे रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. या आगीत शेतातील काढलेला गहू, मका आणि सुमारे १६ बिघे शेतातील चारा जळून खाक झाला आहे. कडक ऊन आणि सोसाट्याचा वारा असल्यामुळे शेतातील गवत व चाऱ्याने क्षणात पेट घेतला आणि आग वेगाने पसरत गेली.
या आगीची झळ चिन्मय हॉटेल आणि जवळील मोठ्या झाडांनाही बसली. हॉटेलला लागलेली आग वेळीच विझवण्यात आली, मात्र वारा सुरू असल्याने शेतातील आग घरांच्या दिशेने पसरू लागली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून माजी नगरसेवक किरण बागुल, जालिंदर चौधरी आणि श्याम बागुल यांनी पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना तातडीने माहिती दिली.
त्यानंतर अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी यांनी पालिकेचे तिन्ही बंब घटनास्थळी रवाना केले. दिनेश बिराडे, फारूक शेख, मच्छीन्द्र चौधरी, आकाश संदानशिव आणि जफर पठाण यांनी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. आगीची तीव्रता एवढी होती की गाड्यांमधील पाणी संपल्यानंतर ते पुन्हा भरून आणण्यात आले. अखेर घरांकडे सरकणारी आग आटोक्यात आणण्यासाठी रामवाडीच्या बाजूने पाण्याचा मारा करत अग्निशमन दलाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.










