जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव तालुक्यातील आमोदा बु. येथील एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ५५ हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मंदिरातील दानपेटीत जमा झालेली ५५ हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
याप्रकरणी पंढरीनाथ आत्माराम सूर्यवंशी (वय ७३, रा. आमोदा बु., ता. जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५(अ) आणि ३३४(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी दिनेश हिरामण चव्हाण करीत आहे.









