रावेर तालुक्यातील के-हाळे खुर्द येथे घटना
रावेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील के-हाळे खुर्द येथे राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्धेच्या घरात शिरून अज्ञात दोन ते तीन चोरट्यांनी जबरी चोरी केल्याची घटना २१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली. चोरट्यांनी वृद्धेच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओढून काढत आणि घरातील रोकड मिळून एकूण ३२,००० रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे.

फिर्यादी सकुबाई सोमा सोनवणे (वय ७०) या के-हाळे खुर्द येथे आपल्या राहत्या घरात झोपलेल्या होत्या. २१ एप्रिल रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास अज्ञात २ ते ३ चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. या चोरट्यांनी सकुबाई यांच्या कानातील आणि नाकातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओढून काढले. तसेच घरातील पाकिटात ठेवलेली ६ हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले.
या घटनेप्रकरणी सकुबाई सोनवणे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









