जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी):- कौटुंबिक वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाल्याची घटना शिरसोली प्र. न. परिसरात घडली आहे. जुन्या घरगुती वादातून एका २४ वर्षीय तरुणावर त्याच्याच नातेवाईकांनी कुर्हाड आणि विळ्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरसोली येथील रहिवासी सागर सुपडू पाटील (वय २६) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दि. १९ एप्रिल रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. सागर आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपींनी सागरला गाठले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
हा वाद इतका विकोपाला गेला की, संशयित आरोपी गोविंदा पाटील याने त्याच्या हातातील कुर्हाडीने सागरच्या डोक्यावर प्रहार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. याच वेळी आरोपी निकिता पाटील हिने तिच्या हातातील विळ्याने सागरच्या उजव्या हाताच्या दंडावर वार करून दुखापत केली, तर प्रशांत गोविंदा पाटील याने हाताने बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर ‘तुला पुन्हा बघून घेऊ’ अशी जीवे मारण्याची धमकीही या तिघांनी सागरला दिली.
सागर पाटील यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोविंदा पाटील, निकिता पाटील, प्रशांत गोविंदा पाटील (सर्व रा. शिरसोली प्र. न., ता. जि. जळगाव) या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल धनराज गुळवे करीत आहेत.









