नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – मोदींच्या मंत्रिमंडळात थाटात शपथ घेतलेल्या मराठमोठ्या नारायण राणेंनी आज आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताना राणेंंनी नोंदबुकमध्ये ‘ओम श्रीगणेशा’ लिहित आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी सेनेविरोधातही श्रीगणेशा केला. पदभार स्वीकारलेल्या खुर्चीवरुनच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पहिला वार केला. ‘मला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पण उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या नाहीत. कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही’, असं म्हणत राणेंनी मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच उद्धव यांच्यावर निशाणा साधला. तर ‘शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंना मंत्रिपद दिलं असेल तर हा मोदींच्या कॅबिनेटचा अपमान आहे’, अशी पहिली प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिलीय.
2019 साली केंद्रात बहुमताने सत्तारूढ झालेल्या नरेंद्र मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. सरकार स्थापन होऊन जवळपास दोन वर्ष उलटल्यानंतर मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये 43 मंत्र्यांनी शपथ घेतली. अगदी पहिल्या क्रमांकाला राणेंनी मोठ्या थाटात पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राणेंकडे लघु आणि मध्यम उद्योग विभागाची जबाबदारी सोपविण्यात आलीय. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला.
पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मोदी, शहा आणि नड्डांचे पुन्हा एकदा आभार मानले. तसंच मोदींच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आज्ञेने महाराष्ट्रासह देशाच्या विकासासाठी काम करेन, असा विश्वास जनतेला दिला. यावेळी त्यांनी चांगल्या कामाची सुरुवात म्हणून नोंदवहीत ओम श्रीगणेशा लिहिलं. अधिकाऱ्यांकडून खात्याची विस्तृत माहिती घेतली.