अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने भावजयीचा खून; दीराला जन्मठेप


पुरावे नष्ट करणाऱ्या सासूला तीन वर्षांची सक्तमजुरी; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
जळगाव | प्रतिनिधी
मोठ्या भावाच्या पत्नीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असताना तिने विरोध केल्याने तिचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी दीर प्रवीण छगन बैरागी (वय २६, रा. कुंझर, ता. चाळीसगाव) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच खुनानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याची आई लिलाबाई छगन बैरागी (वय ५०) हिला तीन वर्षांची सक्तमजुरी सुनावण्यात आली.हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांच्या न्यायालयाने १८ ऑगस्ट रोजी दिला.
दीराची विवाहितेकडे वाईट नजर
भडगाव तालुक्यात माहेर असलेल्या महिलेचा २०१३ मध्ये चाळीसगाव तालुक्यातील कुंझर येथील सीआयसीएफमध्ये नोकरीस असलेल्या जवानासोबत विवाह झाला होता. २०१८ मध्ये तिचे पती चेन्नई येथे नियुक्तीवर होते. त्यामुळे विवाहिता सासू, सासरे आणि दीर प्रवीण बैरागी यांच्यासोबत कुंझर येथे राहत होती.
दरम्यान, प्रवीण हा तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. त्याने एकदा तिचा हात पकडून शरीरसुखाची मागणी केल्याचेही तपासात समोर आले होते. या त्रासामुळे विवाहिता माहेरी गेली होती. मात्र, घटनेच्या काही दिवसांपूर्वी माहेरच्या मंडळींनी समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठविले होते.
मृतदेह पाहिल्यानंतर वडिलांना संशय
४ जुलै २०१८ रोजी विवाहितेला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती तिच्या वडिलांना देण्यात आली. ते तातडीने कुंझर येथे पोहोचले. मुलीचा मृतदेह पाहिल्यानंतर तिच्या गळ्याभोवती आवळल्याच्या खुणा, जीभ बाहेर आलेली तसेच अंगावर नखांनी ओरबाडल्याच्या खुणा दिसल्या. कपड्याचे बटनही तुटलेले आढळले.यामुळे संशय बळावल्याने त्यांनी मेहुणबारे पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार प्रवीण बैरागी, त्याची आई लिलाबाई बैरागी आणि आजेसासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शवविच्छेदनातून गळा आवळून खून स्पष्ट
मृतदेहाचे धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टर आर. के. गढरी यांनी हा अहवाल दिला.
मृत महिलेच्या गळ्यावरील बारीक कण तसेच घटनास्थळी आढळलेल्या दोरीचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणीत दोरी व संबंधित कण यांच्यात साम्य आढळल्याचे न्यायालयीन पुराव्यात समोर आले.
मुलीची साक्ष ठरली महत्त्वाची
घटनेच्या वेळी मृत महिलेची मुलगी तिच्याजवळ झोपलेली होती. घटनेदरम्यान मुलीला जाग आल्याचे तपासात समोर आले. तिच्यासह मृत महिलेचे वडील, पंच आणि तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षी खटल्यात महत्त्वाच्या ठरल्या.
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ, जयपाल हिरे आणि पीएसआय हेमंत शिंदे यांच्या साक्षीही महत्त्वपूर्ण ठरल्या. आरोपींनी खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
प्रवीण बैरागीला विविध कलमांखाली शिक्षा
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी प्रभावी युक्तिवाद केला. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने प्रवीण बैरागी याला खून केल्याप्रकरणी जन्मठेप व २० हजार रुपये दंड, अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.पुरावे नष्ट केल्याप्रकरणी लिलाबाई छगन बैरागी यांनाही तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.न्यायालयाने दंडाच्या रकमेतून ३५ हजार रुपये मृत विवाहितेच्या मुलीला देण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्याचे पैरवी अधिकारी म्हणून अमोल पाटील यांनी काम पाहिले









