आरोपीला अटक, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील दहिगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता पीडित मुलीचे काका यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी सबीर ऊर्फ आसिफ गुलाब पिंजारी (वय २२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या घराशेजारी राहणारी अल्पवयीन मुलीच्या ओळखीचा असलेला आरोपी सबीर याने २० जुलै २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास तिच्या घरातून तिला बोलावून घेतले. त्यानंतर तिला गावातील स्मशानभूमी परिसरात नेऊन तिच्यावर रात्री अत्याचार केला.
या प्रकरणी आरोपी सबीर ऊर्फ आसिफ गुलाब पिंजारी याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२), ६४(२)(एम), ६५(१) आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पॉक्सो कायदा) कलम ४, ५(एल), ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.








