नशिराबाद पोलिसांकडून नराधम सुपरवायझरला अटक
जळगाव, (प्रतिनिधी) :- येथील नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संतापजनक घटना समोर आली असून, एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला चिकू खाण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका ४३ वर्षीय नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी सुनील अर्जुनराव सावके (वय ४३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी २० जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास आपल्या घराजवळ खेळत असताना आरोपी सुनील सावके याने तिला चिकू खाण्याचे आमिष दाखवून चिकूच्या बागेत (मळ्यात) नेले. तेथे आरोपीने अल्पवयीन मुलीचे कपडे काढून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलली. भुसावळ विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी (SDPO) केदार बारबोले यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्र फिरवली. या संपूर्ण तपासाच्या प्रक्रियेत कायदेशीर तरतुदीनुसार ‘ई-साक्ष’ प्रणालीचा (डिजिटल पुरावे) वापर करण्यात आला आहे.
नशिराबाद पोलिसांनी आरोपी सुनील अर्जुनराव सावके याच्याविरुद्ध गु.र.नं. २१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ६४, ६५ आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पॉक्सो कायदा) २०१२ चे कलम ४, ६, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक (पो.उप.नि.) विजय कोळी या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.









