घराचा दरवाजा तोडण्याच्या कारणावरून वाद; दाम्पत्यासह महिलेवर दगडाने हल्ला
चिंचोली येथे मारहाणीत तिघे जखमी; तलवारीने कापून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप


यावल | प्रतिनिधी : यावल तालुक्यातील चिंचोली येथे घराचा दरवाजा पावड्याने तोडल्याच्या कारणावरून विचारणा केल्याचा राग आल्याने दाम्पत्यासह एका महिलेला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरवाजा तोडण्यावरून वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनराज शेणफडू धनगर (वय ४९, व्यवसाय मजुरी, रा. चिंचोली, ता. यावल) यांच्या घराचा दरवाजा पावड्याने तोडल्याबाबत त्यांनी आरोपी मनोज रविंद्र पाटील याला विचारणा केली. याचा राग आल्याने वाद निर्माण झाला.
दगडाने मारहाण करून दुखापत
२२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता चिंचोली येथे आरोपी मनोज रविंद्र पाटील व सुनीताबाई रविंद्र पाटील यांनी फिर्यादी धनराज धनगर व साक्षीदारांना शिवीगाळ करून चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच दगड-विटांचे तुकडे फेकून मारल्याने साक्षीदार लक्ष्मीबाई यांच्या समोरील दोन दात पडल्याचे आणि छातीला दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याशिवाय फिर्यादी धनराज धनगर व त्यांच्या पत्नी मिनाबाई धनगर यांना कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप आहे.
तलवारीने कापून टाकण्याची धमकी
मारहाणीनंतर आरोपींनी, “आमचे नांदी लागले तर तुम्हाला तलवारीने कापून टाकील,” अशा शब्दांत धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी धनराज धनगर यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३२४(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहेत.









