जामनेर शहरात घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- जामनेर शहरांमध्ये एका वृद्धाला रिक्षात बसवून त्याला धमकावून त्याच्याकडे रक्कम लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एलसीबी पथकाने दोन संशयित आरोपींना जळगाव शहरातून अटक केली आहे. त्यांना पुढील कारवाईसाठी जामनेर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.
जामनेर शहरातील भुसावळ चौफुलीवर एका वृद्धाला रिक्षात बसवून त्याच्याकडील रक्कम जबरदस्तीने लुटण्यात आली होती. या प्रकरणी दोन संशयित आरोपींविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतचा तपास पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी एलसीबीला करण्याबाबत आदेशित केले होते.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी त्यांची टीम सहायक फौजदार विजयसिंह पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल अक्रम शेख, पोहेकॉ सुधाकर अंभोरे व पोहेकॉ महेश महाजन, किरण चौधरी, नाईक विजय पाटील, सचिन महाजन यांचे पथक तयार केले व त्यांना तपासासाठी सूचना केल्या.
त्यानुसार सदरचा गुन्हा हा इस्माईल उर्फ राजू शेख शब्बीर शेख (वय ४८, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) आणि सय्यद आरिफ सय्यद सईद (वय ३९ रा. दूध फेडरेशन हुडको,जळगाव) यांनी केल्याचे तपासणीअन्ति निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना जामनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.