जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील आव्हाणे येथील वृध्दाचा गिरणा नदीतून जात असतांना पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घटना ९ जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू आहे.
मधुकर बाबुराव ढोले (भोई) वय-६५, रा. आव्हाणे ता.जि.जळगाव असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.तालुक्यातील आव्हाणे येथे मधुकर ढोले हे आपल्या परीवारासह राहायला होते. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. रविवारी ९ जुलै रोजी रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास शेतात जाण्यासाठी ते घरातून निघाले. गावानजीक असलेल्या गिरणा नदीपात्रातून जात असतांना त्यांचा पाय घसरला. त्याच ते खाली पडल्याने बुडाले. या नदीतून वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात असल्याने मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यात ते बुडाले.
यावेळी ते पाण्यात पडल्यानंतर नदीच्या काठावर असलेल्या काही पट्टीतील पोहणाऱ्या तरूणांनी नदीत उडी घेवून त्यांना बाहेर काढले. त्यानंतर खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत असतांना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपास पो.कॉ. ईश्वर लोखंडे करीत आहे.