बोदवड तालुक्यात येवती येथील घटना
बोदवड (प्रतिनिधी):- तालुक्यातील येवती येथे वीट चोरीच्या तक्रारीत नाव घेतल्याच्या संशयावरून एका तरुणावर लोखंडी कडा आणि दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गुलाब खाँ दिलावर खाँ पठाण (वय ४०, व्यवसाय-ठेकेदार) यांनी आरोपींविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात वीट चोरीची तक्रार दिली होती. याचाच राग मनात धरून, २४ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास येवती गावातील हर्षल सोनवणे यांच्या घराजवळील रस्त्यावर आरोपींनी फिर्यादीला गाठले.
“आमचे नाव चोरीच्या तक्रारीत का घेतले?” असा जाब विचारत आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी फिर्यादीला चापटबुक्क्यांनी आणि लाथांनी बेदम मारहाण केली.
मारहाण सुरू असताना आरोपी क्रमांक १ योगेश युवराज माळी याने आपल्या हातातील लोखंडी कड्याने फिर्यादीच्या डोक्यात प्रहार केला. तर आरोपी क्रमांक २ गजानन गोविंद माळी याने फिर्यादीच्या डोक्यात दगडाने मारून गंभीर दुखापत केली. इतकेच नव्हे तर, “तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही यावेळी आरोपींनी दिली.
या प्रकरणी फिर्यादी गुलाब खाँ पठाण यांच्या तक्रारीवरून बोदवड पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शशिकांत शिवराम महाले करत आहेत.









