डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
जळगाव (प्रतिनिधी) :- देशाचा अर्थसंकल्प गुरुवारी सादर झाला. यावर माजी खासदार तथा गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील आणि भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विकसित भारताचे प्रतिबिंब – डॉ. उल्हास पाटील
सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हे ब्रीद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात विकसित भारताचे प्रतिबिंब दिसून येते. देशात इन्फ्रास्ट्रक्चर वाढीस लागण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांकरीता भरीव तरतूद करण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेची काळजी देखिल या अर्थसंकल्पात घेण्यात आली असून संरक्षण क्षेत्रासाठी ११ लाख ११ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देशात सात ठिकाणी आयआयएम या उच्च शिक्षण देणार्या संस्था मोदी सरकारने स्थापित केल्या आहे. देशातील २५ कोटी जनता ही दारिद्ररेषेबाहेर आली आहे. कनेक्टीव्हिटी वाढण्यासाठी देशभरात विमानतळांचे जाळे उभारले जात आहे. देशात १४९ नवीन विमानतळ विकसित करण्यात आले आहे. यंदा करप्रणाली जैसे थेच ठेवण्यात आल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. परफॉर्म, रिफार्म आणि ट्रान्सफॉर्म ह्या सुत्राच्या आधारे २०४७ पर्यंत देश विकसित राष्ट्र म्हणून ओळखला जाईल यात शंका नाही.
शाश्वत विकासाचा दृष्टीकोन – डॉ. केतकी पाटील
मेक इन इंडिया, स्टार्टअप यासारख्या संकल्पनांच्या माध्यमातून लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात इन्फ्रास्ट्रक्चर, आरोग्य, इंडस्ट्रीयल, शेतकरी, महिला वर्ग, युवापिढी ह्या घटकांच्या विकासासाठी महत्वाच्या आणि मोठ्या तरतूदी मांडण्यात आल्या आहेत. देशात १५ नवी एम्स रुग्णालये तयार केली जाणार आहेत. अर्थव्यवस्थेला बळ मिळावे आणि लोकांना रोजगार मिळावा, यासाठी अनेक कार्यक्रम आणि योजना जनतेच्या हितासाठी केल्या. सरकारचे लक्ष सर्वसमावेशक विकासावर आहे आणि सर्व वर्गासाठी आणि लोकांसाठी विकासाची चर्चा आहे. आत्मनिर्भर भारताकडे दीर्घ पावले टाकण्यात आली असून अमृत काळाचा भक्कम पाया रचण्यात आल्याचे दिसून येत आहे. २०१४ साली स्वातंत्र्य दिनी मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात भारतीय ‘महिला आणि शौचालय’ यांचे दु:ख, आता 10.5 कोटी शौचालयांच्या माध्यमातून साकार होऊन ग्रामीण भागातील महिला वर्गाचा मानसिक आणि शारीरिक त्रास संपुष्टात येत आहे. शाश्वत विकासाचा दृष्टीकोन असलेला हा अर्थसंकल्प आहे.