जळगाव विधान परिषदेसाठी ‘तरुण’ चेहऱ्यांची नावे चर्चेत
जळगाव ( प्रतिनिधी ) – आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमध्ये जळगावची जागा कोणाच्या पारड्यात पडणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी, यावेळी तरुण आणि उच्चशिक्षित चेहऱ्याला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) दिग्गज नेते माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव विशाल देवकर यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दुसरीकडे, महायुतीमधील शिवसेनेचे वजनदार नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे या निवडणुकीत दोन दिग्गज नेत्यांच्या पुत्रांमध्ये सुप्त संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. खानदेशचा प्रलंबित विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी विधान परिषदेत तरुण नेतृत्वाची गरज असून, विशाल देवकर यांच्यासारख्या उच्चशिक्षित तरुणाला संधी मिळाल्यास जिल्ह्याच्या प्रश्नांना नवी वाचा फुटू शकते. आता भाजप आणि राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्ह्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला अनेक दिग्गज नेते दिले आहेत. मात्र, आता वेळ आली आहे ती ‘नेक्स्ट जनरेशन’ला संधी देण्याची. आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून तरुण चेहऱ्याला रिंगणात उतरवण्याचे संकेत मिळत आहेत. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचा राजकीय वारसा आणि विशाल देवकर यांची उच्चशिक्षित प्रतिमा यामुळे राष्ट्रवादीच्या या तरुण नेत्याला भाजपकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू आहे. जर असे घडले, तर जिल्ह्याला एक अभ्यासू तरुण नेतृत्व मिळेल.









