एकाच रात्री ४ वाहने जप्त
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध जळगाव जिल्हा पोलीस दलाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली जिल्हभरात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अवैध वाळू वाहतूक करणारी ४ वाहने जप्त करण्यात आली असून, एकूण २५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

ही धडक कारवाई काल दि. २४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून ते आज २५ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान करण्यात आली. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी ही मोहीम राबवून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना दणका देण्यात आला.
अवैध वाळू वाहतूक करताना आढळलेल्या वाहनांवर बी.एन.एस. २०२३ चे कलम ३०३(२) आणि मोटर वाहन अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भडगाव, चाळीसगाव ग्रामीण, चोपडा ग्रामीण, यावल पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई झाली. एकूण ४ वाहने २५ लाख ५० हजार रुपयांची जप्त करण्यात आली आहेत.









