पिंप्राळा हुडको येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील पिंप्राळा हुडको येथील रहिवासी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
विकास वामन बिऱ्हाडे (वय २६, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, पत्नी, २ मुले, १ मुलगी, २ भाऊ यांच्यासह हुडको येथे वास्तव्याला आहे. हातमजुरी काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. सकाळी तो गावात गेला होता. दुपारी घरी आला असता त्याने कुठल्यातरी नैराश्याखाली येऊन छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी एकच हंबरडा फोडला.
आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत विकासला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबियांसह मित्र परिवाराने आक्रोश केला. रामानंद नगर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.