तहसील कार्यालयाची दिशाभूल करून शासनाची फसवणूक; एकाविरुद्ध गुन्हा

जामनेर तालुक्यातील वाकोद येथील प्रकरण; खोटी मृत्यू नोंद करून शासकीय यंत्रणेला फसवल्याचा आरोप
जामनेर | प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील वाकोद गावातील एका व्यक्तीने तहसील कार्यालयाची दिशाभूल करत खोटी माहिती सादर करून मृत्यूची नोंद करून घेत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहूर पोलीस ठाणे गु.र.नं. १८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(२), ३१८(४) व २१२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी प्रशांत साहेबराव साळुंखे (वय ४२), मंडळ अधिकारी, तोंडापूर भाग, तहसील कार्यालय जामनेर यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणातील आरोपी प्रणव कैलास पाटील, रा. जांभूळ, ता. जामनेर याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपीला त्याचे वडील कैलास विठोबा पाटील यांच्या बेपत्ता होण्याबाबत माहिती असतानाही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तहसीलदार कार्यालयात खोटी माहिती सादर करण्यात आली. त्यानंतर मृत्यू आदेश प्राप्त करून ग्रामपंचायतीमध्ये खोटी मृत्यू नोंद करण्यात आली. या प्रकारामुळे शासनाची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते करीत आहेत.









