जळगाव,;– महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांना सौर ऊर्जा निर्मितीद्वारे मोफत वीज मिळावी यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तीन किलोवॅटपर्यंतचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांना 78 हजार रुपयांपर्यंत सबसिडी केंद्र सरकारकडून मिळते. त्यासाठी केंद्रीय मंत्रालयातर्फे वेबसाईट तयार करण्यात आली असून त्यावर नोंदणी करावी लागते. केंद्र सरकारच्या या योजनेसाठी रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन (आरईसी) ही नोडल एजन्सी आहे.
केंद्र सरकारने योजना घोषित केल्यानंतर तिला भरघोस प्रतिसाद मिळाला. राज्यात आतापर्यंत 1,73,272 ग्राहकांनी नोंदणी केलेली आहे.
मोठ्या प्रमाणात नोंदणी झाल्यानंतर गेल्या काही दिवसात योजनेच्या वेबसाईटबाबत ग्राहकांकडून काही तक्रारी येत आहेत.
प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेच्या वेबसाईटबाबत वीज ग्राहकांना आलेल्या अडचणींची दखल केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय मंत्रालयाने घेतली आहे. या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयातर्फे तज्ञांची तुकडी रविवारी काम सुरू करत आहे.
वेबसाईटबाबतच्या अडचणींची माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शनिवारी व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे दिली. यावेळी नागपूरमध्ये रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या एजन्सीचे प्रतिनिधीही उपलब्ध होते.
ग्राहकांना येणाऱ्या अडचणींची माहिती दिल्यानंतर केंद्रीय मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली व समस्या सोडविण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची तुकडी मुंबईत पाठविण्याचे मान्य केले.
महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी केंद्रीय तुकडीला वेबसाईटच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करेल, असेही व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ठरले.
==============