नाशिक ( प्रतिनिधी ) – भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहारामुळे चर्चेत आलेले सुनील झंवर यांच्या मुलास ना . छगन भुजबळ व त्यांचे पूत्र पंकज भुजबळ यांच्या नावाने फोन करत ‘तुम्ही माझे एक काम करा , मी तुमचे काम करुन देतो’ असे सांगत फसवणूक करताना चक्क जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचेही नाव वापरले गेले. अखेर चौकशी करुन अंबड पोलिसांत महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्यात सुनील झंवर यांच्यावर पुण्याच्या डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल आहे. झंवर यांना ७ सप्टेंबरला अटक करण्यात आली त्यांचा मुलगा सुरज झंवर उच्च न्यायालयात कामानिमित्त आलेला असता, त्यांना ९४२३४२११११ या क्रमांकावरुन फोन आला. मी पंकज भुजबळ बोलत असून, तुम्ही ८ सप्टेंबरला मला जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन भेटा, असे सांगत फोन बंद केला गेला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरुन फोन करुन पंकज भुजबळांचा पीए बोलत असल्याचे सांगत, अजून तुम्ही जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले नाही. कलेक्टर साहेबांचा पीए वाट पाहत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळात जळगाव येथील एका लँण्ड लाइन क्रमांकावरुन फोन करत ‘मी अभिजित राऊत (जळगाव जिल्हाधिकारी) बोलतोय… तुमचे काही काम आहे का? अशी विचारणा केली गेली. मात्र, सुरज झंवर यांनी नाही म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीने फोन ठेवला. त्यानंतर, झंवर यांनी जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. त्यांनाही काहीच माहिती नव्हती. त्याचवेळी जळगाव जिल्हाधिकारी यांच्या लँण्डलाईनवर नाशिकहून पंकज भुजबळ यांचा फोन आल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांच्या पीएने सांगितले. त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा मोबाइलद्वारे पंकज भुजबळ बोलत असल्याचा फोन आला व लँण्ड लाइनवरुन फोन करण्यास सांगण्यात आले.
सुरज झंवर यांनी जळगाव येथील मित्राच्या लँण्ड लाइनवरुन फोन लावला असता, स्वतः छगन भुजबळ असल्याची बतावणी करत, माझा फोन आल्याचे कोणाला सांगणार नाही, असे वचन देण्याचे सांगून तुम्ही माझे एक काम करुन द्या, मी तुमचे एक काम करुन देतो, अशी ऑफर दिली गेली. तुम्हाला समीर व पंकज भुजबळही मदत करतील आणि संपर्कात राहतील, असे सांगत फोन बंद केला गेला.
मोबाईलवर आलेले ऑडिओ क्लिप नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ यांना ऐकवण्यात आल्या. त्यावरून ‘तो’ आवाज त्यांचा नसल्याचे स्पष्ट झाले. नाशिक पोलिसांत १८ सप्टेंबरला तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी चौकशी करत पालकमंत्री भुजबळ, जळगावचे जिल्हाधिकारी राऊत, पंकज भुजबळ यांच्या नावाचा वापर करत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.