जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्याचे पालकमंत्री जळगाव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत स्वच्छता ही सेवा तसेच महात्मा गांधी जयंतीनिमित्त महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि . प . मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी स्वच्छतेचे महत्व तसेच स्वच्छतेमुळे कोविड सारखे संकट कसे पळवून लावू शकतो हे उदाहरणांद्वारे स्पष्ट करून दिले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आरोग्याची पंचसूत्री सांगितली व स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी या अभियानाचे महत्त्व पटवून सांगितले येत्या 100 दिवसात शोषखड्ड्याचे नियोजन करण्याबाबत सूचना केल्या.
प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी तर सूत्रसंचालन क्षमता बांधणी तज्ञ मनोहर सोनवणे यांनी केले.आभार प्रदर्शन सरपंच सचिन पवार व गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे यांनी केले.