जळगाव ( प्रतिनिधी ) – सध्या कोविड-19 मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी नेरी नाका स्मशानभूमी येथे 4 ओटे राखीव ठेवलेले असल्याने औद्योगिक क्षेत्रातील स्माशनभूमीकरीता अधिग्रहीत जागा अधिग्रहणातून मुक्त करण्यास हरकत नसल्याचे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचे सहाय्यक आयुक्त यांनी जिल्हा प्रशासनाला कळवले आहे.
औद्योगिक विकास महामंडळाच्या शहरातील सेक्टर के मधील ओपन स्पेस-10 (81728) चे क्षेत्र 1500 चौमी या जागेचे स्मशानभूमीकरीता करण्यात आलेले अधिग्रहण रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
शासनाकडून ऑक्सिजन प्रकल्पासाठी महामंडळाचे औद्योगिक क्षेत्रात सवलतीच्या दरामध्ये भूखंड देण्याबाबत आदेशित केलेले असल्याने महापालिका आयुक्त यांनी अधिग्रहीत करण्यात आलेल्या जागेच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात तयार करण्यात आलेल्या स्मशानभूमीकरीता उपलब्ध असलेली साधनसामुग्री महानगरपालिकेच्या इतर स्मशानभूमीमध्ये तात्काळ स्थलांतरित करुन हे क्षेत्र औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकाकडे ताब्यात देण्याची कार्यवाही करावी. असेही जिल्हाधिकारी यांनी या आदेशात म्हटले आहे.