जळगाव (प्रतिनिधी) : अमळनेर शहरात एका महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आणि विरोध केल्यास पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात ५२ वर्षीय आनंदा पाटील (रा. अमळनेर) याच्याविरुद्ध बलात्कारासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहिती नुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. दाखल तक्रारीनुसार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता पीडित महिला घरी एकटी असताना आरोपी तिच्या घरी आला. यावेळी महिलेने त्याच्या वारंवार घरी येण्याबाबत विचारणा केली असता, आरोपीने तिच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे. या धमकीनंतर आरोपीने महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, गेल्या दोन वर्षांपासून आरोपी वारंवार फोन करून धमकावत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.





