जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील डिकसाईच्या शेतशिवारात महावितरणच्या लोम्बकळलेल्या तारांमुळे शेतात काम करताना विजेचा धक्का लागल्याने एका शेतमजूरला प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना शनिवारी दि. २९ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
राजेंद्र रूपचंद पवार (वय ३६, रा. डिकसाई ता. जळगाव) असे मयत शेतमजुराचे नाव आहे. तो गावामध्ये पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा यांच्यासह राहत होता. डिकसाई गावातील किरण प्रल्हाद महाजन यांच्या शेतात मजुरी करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान शनिवारी दि. २९ जुलै रोजी सकाळी पाऊस सुरू होता. शेताची कामे सुरू होते. त्यावेळेला राजेंद्र पवार हा शेतात काम करत असताना महावितरणच्या तारा शेतात पडलेल्या होत्या.
त्या राजेंद्र पवारला दिसून न आल्याने त्याला विजेचा जोरात धक्का बसला. लवकर कोणाच्या लक्षात आले नाही. मात्र दुपारी काही शेतमजूर महिलांना तो शेतात पडून असलेल्या स्थितीत दिसून आला. आजूबाजूच्या ग्रामस्थांना बोलावले असता त्यांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव या ठिकाणी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी सोसे यांनी तपासणीअंती त्याला मयत घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. कुटुंबप्रमुखच मयत झाल्यामुळे कुटुंबावर मोठा आघात कोसळला आहे. महावितरण कंपनीकडून पवार परिवाराला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.